३१ डिसेम्बर २०२४
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- सिन्नर फाटा येथे माजी नगरसेवक बाजीराव भागवत यांच्या सदाशिव पॅलेस या अपार्टमेंटच्या गाळ्यामध्ये इंडिया नंबर वन बँकेचे एटीएम असून, अगदी यासमोरच सिन्नर फाटा पोलीस चौकी आहे; मात्र असे असतानाही पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम मशीन कटरच्या सहाय्याने तोडून वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला.
सिन्नर फाटा येथे असलेल्या इंडिया बँकेचे एटीएम मशीनजवळ येऊन पहाटे 3.35 वाजता तीन ते चार चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन तोडले. अर्ध्या तासात हे मशीन पूर्णपणे कापून काढून ते बाहेर आणले व पिकअप व्हॅनमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरू केला; मात्र त्याच वेळी रस्त्यावरून जाणार्या एका रिक्षाचालकाच्या ही बाब लक्षात आली.
त्यामुळे या रिक्षाचालकाने तेथून दोन फेर्या मारून या घटनेचा अंदाज घेऊन थेट नाशिकरोड पोलीस ठाणे गाठले; मात्र त्याच वेळी रिक्षाचालक आपल्या मागावर असल्याचे चोरट्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सदर एटीएम मशीन तेथेच टाकून पिकअप व्हॅनसह तेथून धूम ठोकली. या घटनेची रिक्षाचालकांकडून माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाचे हवालदार विजय टेमगर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची पाहणी करून चौकशी सुरू केली.
मात्र पोलीस चौकीसमोरच एटीएम पळवून नेण्याचा प्रयत्न होत असताना तेथील पोलिसांच्या नजरेतून ही घटना कशी सुटली, याची आता नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, सामनगाव रोडवर पॉलिटेक्निकजवळ आठ महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे एटीएम फोडण्याची घटना घडली होती. त्याचा अद्यापही तपास लागलेला नाही.
Copyright ©2025 Bhramar