राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात आता लहान मुलींवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटना तर अधिक चिंताजनक आहेत. मुली कुठेही सुरक्षित नाहीत. घराबाहेर तर नाहीच पण घरात सुद्धा आज काल लहान मुली असुरक्षित आहेत. अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक नराधम भावानेच आपल्या बहिणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मुंबईतील विक्रोळी परिसरात नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या सख्ख्या बहिणीला वासनेचा शिकार बनवलं आहे. आरोपीनं पीडित मुलीला मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवत तिच्यावर अत्याचार केला आहे. अत्याचारानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली, त्यानंतर आरोपीचं काळं कृत्य समोर आलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास विक्रोळी पोलीस करत आहेत.,
मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय आरोपी तरूण आपली लहान बहीण आणि आई वडिलांसह मुंबईतील विक्रोळी भागात वास्तव्याला आहेत. आरोपीनं जून महिन्यात घरी कुणी नसल्याचा फायदा घेत, १४ वर्षांच्या लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. त्याने मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवत सख्खा बहिणीला वासनेचा शिकार बनवलं होतं. त्यावेळी पीडित मुलीनं भावाला घाबरुन या घटनेची वाच्यता कुठेच केली नव्हती.
त्यामुळे आरोपीची हिंमत आणखी वाढली. यानंतर आरोपीनं अलीकडेच नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा बहिणीवर अत्याचार केला. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार विक्रोळी परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला.
दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने आरोपीची रवानगी डोंगरी येथील बालसुधार गृहात केली आहे. पण अशाप्रकारे मोबाईलच्या आहारी जाऊन आरोपीनं सख्ख्या बहिणीवर अत्याचार केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.