आजकाल लुटमार, चोरी अशा घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून काही भामटे समोरच्या व्यक्तीला असं काही गंडवतात की त्यावर त्या स्वतः व्यक्तीचा सुद्धा विश्वास बसत नाही. अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे.
‘हम तुम्हारे गुरू है’ असं म्हणत पंढरपुरातील एका पत्रकाराला तीन अज्ञात व्यक्तींनी लुटल्याची घटना समोर आली आहे. या तीन भामट्यांनी पत्रकाराच्या हातातील चाळीस हजारांची सोन्याची अंगठी आणि खिशातील रोख असे 3 हजार पाचशे रुपये असा 43 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात तीन व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास भटुंबरे हद्दीतील संत जनार्दन स्वामी महाराज मठासमोर पत्रकार हरिभाऊ प्रक्षाळे उभे होते. तेव्हा पांढऱ्या रंगाच्या कारमधून तीन व्यक्ती आल्या आणि त्यांनी प्रक्षाळे यांना ‘हम तुम्हारे गुरु है’’ असं म्हणत ‘महाकुंभ मेले में शाहीस्नान के लिए जाना है, तुमने हमें पहचाना नहीं, हमको सौ रुपये की जरूरत है, दे देना.’ असं म्हटल्यानंतर प्रक्षाळे यांनी खिशातून शंभर रुपये काढून त्यांना दिले. पण त्याचवेळी या बाबासोबत असलेल्या तीन जणांनी हातचलाखी करून प्रक्षाळे यांच्या हातातील साडेआठ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी ज्याची किंमत ४० हजार रुपये आहे. ती अंगठी प्रक्षाळे यांच्या लक्षात न येता काढून घेतली. बरं हे इथंच थांबले नाही. त्यांनी या पत्रकाराच्या खिशातील ३५०० रुपये सुद्धा काढून घेतला.
बाबाच्या मठापासून काही अंतरावर दूर गेल्यानंतर पत्रकार प्रक्षाळे यांना लक्षात आलं नाही, आपली अंगठी आणि खिशातले पैसे कुणी तरी काढून घेतले. त्यांनी तसंच मागे येऊन पाहिलं तर तोपर्यंत हे तीन ही भामटे पसार झाले होते. त्यानंतर प्रक्षाळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत अज्ञात तीन व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गावडे करत आहेत.