राज्यात विधासभा निवडणुकीत महायुती सरकारने घवघवीत यश मिळविले असून विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे आता स्थानिक पातळीवरची पदाधिकाऱ्यांची फळीच बदलण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना मुंबईत प्रत्येक शाखेतील पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे. त्यामुळे पक्षाला मुंबईत नाविन्याने आणि उत्साहाने पालिका निवडणुकीला सामोरं जाता येणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईच्या रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती रामदास कदम यांनी बैठकीनंतर दिली.
“खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज झाली. या बैठकीत संघटनात्मक चर्चा झाली. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत सुद्धा चर्चा झाली. येत्या 23 तारखेला मुंबईच्या बीकेसीमध्ये भव्य मेळावा पार पडेल. त्या मेळाव्यात शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार यांचा भव्य सत्कार केला जाईल. मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार होईल. 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हा मेळावा आयोजित केला आहे. मुंबईतील सर्व शाखाप्रमुख आणि सर्व पद रिक्त करून नवीन नियुक्ती केली जाईल”, अशी महत्त्वाची माहिती रामदास कदम यांनी दिली.
तसेच , “मुलाखती घेऊन तशा प्रकारची नियुक्ती केली जाईल. कोणी कशाप्रकारे काम केलं याचा आढावा घेऊन समिती नियुक्ती करेल. गिरगाव, दादर अशाप्रकारे समित्या गठीत केल्या जातील. ज्या समितीला जे नाव योग्य वाटेल ते नाव ती समिती मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना कळवेल आणि मग मुख्य नेते एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेऊन नियुक्ती करतील, असा निर्णय आजच्या बैठकीत झाला”, असं रामदास कदम यांनी सांगितलं.