राज्यात विधासभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळविले असून आता महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान आता सर्वांचे लक्ष महापालिका निवडणुकीकडे लागले आहे. याच दरम्यान आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे .
भाजपचं शिर्डीत राज्यस्तरीय शिबीर सुरु आहे. या शिबारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
“भाजपात श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र पाळला जातो. ज्यांना हा मंत्र समजला ते यशस्वी झाले, ज्यांना नाही समजलं त्यांची निवडणुकीत हालत बुरी झाली. मकरसंक्रमण संपून महाकुंभाचे अमृत घेण्यासाठी हजारो लोक एकत्र येत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला शंभरहून अधिक जागा दिल्या. गेल्या 30 वर्षात ही कामगिरी करणारा भाजप एकमेव पक्ष आहे. लोकसभेत आपल्या 17 जागा निवडून आल्या. पण त्यानंतर आपण प्रयत्न केले. 288 पैकी 237 जागा जिंकून आपण इतिहास निर्माण केला आणि मेरिटमध्ये पास झालो. भाजपने आजवरच्या सत्ताधारी पक्षाच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच , “लोकांची सेवा करणे ही राज्यकर्ता म्हणून आमची आणि कार्यकर्ता म्हणून तुमची जबाबदारी आहे. आपण सुखासीन झालो तर हा लोकांनी दिलेल्या जनमताचा अवमान ठरेल. लोकसभेच्या काळात अराजकतावादी शक्तींचा प्रभाव महाराष्ट्रात होता. काँग्रेस, शरद पवारांचा पक्ष आणि उबाठाने राज्यात व्होट जिहाद केला. निवडणुकीत पराभव केला तरी ते शांत बसले नाहीत. बांग्लादेशी खोट्या कागदपत्रांच्या आधारे मतदार याद्यांमध्ये घुसत आहेत. महाराष्ट्रात व्होट जिहाद पार्ट 2 सुरू झालाय”, असा धक्कादायक दावा देंवेंद्र फडणवीस यांनी केला. “एक हैं तो सेफ हैं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी सांगितलं आणि ते निवडणुकीत खरं ठरलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले
दरम्यान , “स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तीन-चार महिन्यात येतील. सुप्रीम कोर्टाचा निकाल येणं बाकी आहे. विधानसभेत विजय मिळवला तर येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा विजय मिळवायचा आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.