गेल्या दोन तीन दिवसांपासून बुलढाण्यातील शेगांव तालुक्यातील ग्रामस्तांना केस गळती अजब आजार होत असल्याचे समोर आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील ११ गावांतील नागरिकांची केस गळती का होत आहे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.दरम्यान ही केस गळती का होत आहे यासाठी अनेक नमूने तपासले आहेत, परंतु केस गळती पाण्याने किंवा फंगल इन्फेक्शनमुळे झालेली नसल्याचे उघडकीस आले.
आतापर्यंत या टक्कल पडण्याच्या घटनेचे बळी ठरलेल्यांची संख्या १३९ वर पोहचली आहे. या गावातील पाणी तपासल्यानंतर अहवाल आला आहे. या पाण्यात काही विशेष दोष आढळले नसल्याचे म्हटले जात आहे. तसेच फंगल इन्फेक्शन देखील यास जबाबदार नसल्याचे म्हटल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांना तपासण्यासाठी खास पथक मागविण्यात आले आहे.
बुलढाण्यातली बोंडगाव, कालवड, हिंगणा अशा ११ गावातील रहिवाशांमध्ये टक्कल व्हायरस पसरला आहे. त्यामुळे अनेकांचे केस गळत असल्याचे उघडकीस आले आहे. आधी लोकांना डोक्यात खाज येते. नंतर सरळ केसच हाती येतात आणि त्यानंतर थेट चक्क टक्कल पडत असल्याचे उघडकीस येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणात पाण्याचे नमूने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रभावित गावातील पाणी दूषित नसल्याचे उघडकीस आल्याने आणि हे फंगल इन्फेक्शन नसल्याचेही उघड झाले आहे.
ही केस गळती नेमकी का होते? या प्रश्नाच्या उत्तर शोधण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर ) पथक दिल्लीतून उद्या ( सोमवारी ) बुलढाणा जिल्ह्यात दाखल होत आहे. परिणामी, केसगळतीच्या कारणाचे गूढ अद्यापही कायम आहे. त्यामुळे बाधित गावकऱ्यांसह आरोग्य विभागाची चिंता आणखीनच वाढली आहे.