इगतपुरी तालुक्यातील भरवजच्या ग्रामसेविका सुवर्णा आहेर यांच्या विरुद्ध ३० हजाराची लाच स्वीकारल्याने घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार शेती व जमीन खरेदी विक्री खाजगी एजंट म्हणून व्यवसाय करतात. तक्रारदार व त्यांचे मित्र यांनी आदिवासी जमीन बिगर आदिवासी व्यक्तीच्या नावे खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी नाशिक येथे अर्ज केला आहे.
ह्या अनुषंगाने ग्रामपंचायत भरवज यांच्याकडून ठराव घेण्याबाबत तहसीलदार इगतपुरी यांनी आदेशीत केले. तक्रारदार याबाबत ग्रामपंचायतीत विचारणा करण्यास गेले असता ग्रामसेविका सुवर्णा आहेर यांनी त्यांच्याकडे ठराव देण्याच्या मोबदल्यात ३० हजाराची पंचासमक्ष मागणी करून मंगळवारी ३० हजाराची लाच पंचासमक्ष स्विकारली. म्हणून त्यांच्या विरुध्द घोटी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पथकातील हवालदार संदीप हांडगे, सुरेश चव्हाण, राजश्री अहिरराव, संतोष गांगुर्डे यांनी हा सापळा यशस्वी केला.