अपघातामध्ये शाळकरी मुलांनी गमावला जीव...
अपघातामध्ये शाळकरी मुलांनी गमावला जीव...
img
दैनिक भ्रमर
चांदवड - मनमाड मार्गावर झालेल्या अपघातात दोन शाळकरी अल्पवयीन मुलांना आपला प्राण गमवावा लागला. शाळा सुटल्यानंतर घरी निघालेल्या दोन शाळकरी मुलांचा बाजूने जाणाऱ्या ट्रकच्या मागील टायर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आलेल्या मोकाट जनावरांमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

चांदवड मनमाड मार्गावर आज दुपारनंतर सदर अपघाताची घटना घडली. मार्गाच्या बाजूलाच असलेल्या  दरेगाव रस्त्यावर स्वामी विवेकानंद शाळा असून सदर शाळा सुटल्यामुळे विद्यार्थी घरी निघाले होते. या मार्गावर घरी परततांना आदित्य मुकेश सोळसे (वय १६) वैष्णवी प्रवीण केकान (वय १६) दोघे राहणार हनुमान नगर हे दोन विद्यार्थी शाळा सुटल्यामुळे आपल्या घरी निघाले होते. बाजार समितीच्या गेट समोरून जातानाच बाजार समितीतून मोकाट जनावरांची झुंड आला. अचानक गायी रस्त्यावर आल्यामुळे याच रस्त्याने एम एच १८ बी जी ६६८१ या क्रमांकाचा ट्रक जात असताना सदर दोन मुले एमएच ४१ एन १३९८ या मोटारसायकलने जात असतांना ट्रक आणि मोटारसायकलचा अपघात झाला. ही दोन्ही मुले ट्रक खाली आली असता दोघांचे चिरडून जागीच मृत्यू झाला.

सदर अपघात हा मोकाट जनावरांमुळे झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दोन्ही विद्यार्थी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात इयत्ता दहावी वर्गात शिकत होते. दोन्ही विद्यार्थी १६ वर्षीय अल्पवयीन आहे.  सोळसे आणि केकान कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. दोन्ही कुटुंबीय गरीब आहे. यातील वैष्णवी प्रवीण केकान यांना तीन मुली असून मुलगा नाही. या तीन बहिणीत वैष्णवी ही दोन नंबरची मुलगी होती. तर आदित्य सोळसे हा हनुमान नगर येथे मामाच्या घरी राहायला होता. तर त्याचे आई वडील हे संभाजी नगर येथे राहायला असून आदित्यला एक भाऊ आणि एक बहीण आहे. दरम्यान पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतली असून ट्रक चालक राकेश दादाजी खैरनार (रा कौळाने, ता मालेगाव) यास ताब्यात घेतले आहे. 

मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ..

मनमाड शहरात गेल्या काही वर्षांपासून मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. रस्त्याने मोकाट जनावरे पळू लागले की महिला वृद्ध बालकांची एकच तारांबळ होते. काहीवेळा सांडांनी मारल्याच्या घटना घडल्या आहेत. तर दोन सांडांची झुंज झाल्यास भर बाजारपेठेत एकच धावपळ सुरू होते. अनेकदा दोन चाकी गाड्यांचे मोठे नुकसान होते. तर काही वेळा झुंजीत सापडल्यास अपघात होऊन काहींना अपंगत्व आले आहे.

मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध बैठक मारून बसत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होतो. महामार्गावर मोकाट जनावरे रस्ता अडवून उभे राहत असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होते. आज झालेला अपघातही मोकाट जनावरांमुळेच झाला असून मोकाट जनावरे बाजार समितीतून बाहेर आल्यामुळे रस्त्यात आली आणि ट्रक मोटारसायकलचा अपघात होऊन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group