नाशिक :- मालेगाव मधील बांगलादेशच्या दिलेल्या दाखल्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी विशेष तपास समिती म्हणजे एसआयटीची स्थापना राज्य सरकारने केली आहे. याबाबतचा आदेश आज महाराष्ट्र शासनाचे गृह विभागाचे कक्ष अधिकारी आ. ज. गोरे यांनी काढले आहेत.
मालेगावमध्ये बांगलादेशी नागरिकांना नागरिकत्व मिळण्यासाठी म्हणून मालेगाव तहसील कार्यालय, मालेगाव महानगरपालिका यांच्याकडून रेशन कार्ड व तहसील कार्यालयातील इतर कागदपत्रांसह मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने बनावट जन्मदाखला दिल्याचे प्रकरण भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी समोर आणले होते. या प्रकरणावर त्यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने एस आय टी चौकशीची स्थापना करण्याची मागणी केली होती.
सर्व प्रकरणाची दखल घेऊन राज्य शासनाने मंगळवारी गृह विभागाचे कक्ष अधिकारी आज गोरे यांच्या आदेशाने एसआयटीची स्थापना केली आहे. या प्रकरणाचा तपास आता एसआयटी मार्फत होणार असून या समितीच्या अध्यक्षपदी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सदस्य म्हणून नगर विकास विभागाच्या नासिक आयुक्त कार्यालयातील सहआयुक्त, नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि सदस्य सचिव पदी मालेगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
गृह विभागाच्या कक्षा अधिकारी गोरे यांनी काढलेल्या या पत्रामध्ये म्हटले आहे की, या सर्व प्रकरणाचा तपास करून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावयाचे आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता भविष्यात असे अनुचित प्रकार घडू नये म्हणून आवश्यक उपाययोजना सुचविण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. या आदेशामुळे बांगलादेशी नागरिकांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राची आता चौकशी सुरू झाली आहे.