राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक दिग्दज नेत्यांना डच्चू देण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्याकडून सातत्याने व्यक्त केली जात आहे. या दरम्यान छगन भुजबळ यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
“आता अनेकांच्या पतंगी तर कापल्या. आता आपल्या सहकाऱ्यांसोबत पतंग उडवू. माझी पतंग कोणी कापली नाही. मी या येवला मतदारसंघाचा आमदार आहे, आणि तो पाचव्यांदा आहे. माझा जन्म येवल्यातील नाही, माझे कुटुंब येवल्यातील नाही. तरी मतदारसंघातील जनतेने मला मागील २० वर्षे आणि पुढील पाच वर्षे आमदारकी बहाल केली. माझी पतंग कोणीही कापणार नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.छगन भुजबळ येवला दौऱ्यावर होते. त्यावेळी जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांबरोबरच राज्यातील राजकीय प्रश्नांवरही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर प्रश्न विचारला असता, माझ्या दृष्टीने त्यांचा विषय बंद झालेला आहे. माझ्याविरुद्ध कोणी काही बोलले नाही तर मी बोलायलाच पाहिजे, असे नाही. माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत, असे भुजबळ म्हणाले. राज्यात द्वेषाचे वातावरण असून ते निवळण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे शरद पवार म्हणाले. यावर भुजबळ यांना विचारले असता, एखाद्या जिल्ह्यात तालुक्यात अशी परिस्थिती झाली असेल याचा अर्थ संपूर्ण राज्यात अशी परिस्थिती झाली असे नाही. आता मी शेगाव वरून आलो आहे, तिथे काही तशी परिस्थिती नाही. कुठल्याच गावात हे होता कामा नये, त्यासाठी आपल्याला काळजी घेतली पाहिजे.
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्री होत असल्याचे लक्षात आणून देताच भुजबळ म्हणाले, माझी महाराष्ट्रातील जनतेला विनंती. एखादा सण हा आनंदात, उत्साहात साजरा झाला पाहिजे. उत्सव हे दुसऱ्याला दुःख देण्यासाठी नसतात. नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना व विक्रेत्यांना थांबवा, पोलिसांच्या ताब्यात द्या, असे भुजबळ म्हणाले.