सातपूर मधील बनावट नावे फर्जी फायनान्शिअल सर्विसेस कंपनीने बचत गट कर्ज योजना, सबसिडी कर्ज योजनेच्या नावाखाली पैसे गोळा करून सातपूर शहरासह नाशिक जिल्ह्यातील शेकडो महिला व नागरिकांच्या लाखो रुपयांना गंडा घालून पोबारा केल्याची घटना काल उघडकीस आली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेले असता, तक्रार घेतली जात नसल्याने शेकडो महिलांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले.
याबाबत मिळालेले सविस्तर माहिती अशी की, सातपूर मधील श्रमिक नगर मध्ये जगताप कॉम्प्लेक्स मध्ये शॉप न. ६६ मध्ये भाडे तत्त्वावर फर्जी फायनान्शिअल कंपनी नावाने एस. कुबेर सर्विसेस, साईबा फायनान्शिअल सर्विसेस नावाने अनिल आंभोरे यांनी जून २०२४ मध्ये व्यवसाय सुरु करून सुधीर काळे यांस व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली. व महिला उद्योजिका सबलिकरण करण्याच्या नावाखाली महिला व्यवसायसाठी बचत गट कर्ज योजना सबसिडी कर्ज योजना सुरु केली. यामध्ये १ लाख ते १० लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचे कबूल केले. त्यासाठी कर्जाचा रक्कमेनुसार सुधीर काळे यांनी शेकडो महिला व नागरिकांकडून १५०० ते ५० हजार रुपये प्रोसेसिंग फी म्हणून गोळा केले.
यामध्ये सातपूर व नाशिक जिल्हातील विविध भागातील ब्युटी पार्लर, भाजीपाला, चहा टपरी, साडी दुकान, खाद्यपदार्थ विक्री करणारे अशा अनेक व्यवसायिक कडून पैसे जमा केले. सदर नागरिकांना सदर सर्विसेस कडून विविध बँकाचे कर्ज मंजूर झाल्याचे नकली चेक देखील दिले. परंतु चेक क्लेर होत नव्हते. तसेच काहींना तर तीन महिन्या पासुन आज-उद्या कर्ज पैसे खात्यात जमा होईल असे सांगितले जात होते. परंतु कर्जाची रक्कम मिळत नसल्याचे काही महिलांना लक्षात आल्या नंतर त्यांनी श्रमिकनगर मधील के. के. फायनान्शिअल सर्विसेस व शिवसेना उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर याच्या कार्यलयात जाऊन सदर प्रकार सांगितला.
कांडेकर यांनी जगताप कॉम्प्लेक्स मध्ये जाऊन चौकशी केली असता सदर फायनान्स कंपनी फर्जी असल्याचे लक्षात येताचं, परिसरातील महिला पर्यंत सदर बातमी पोहचताच शेकडो महिला नी सदर ठिकाणी गर्दी केली. सुधीर काळे यांनी आपले फोन बंद करून कार्यालयाला टाळे ठोकून पलायन केले होते. सदर ठिकाणी व्यवस्थापक सुधीर काळे यांची आई व बहीण यांनी येऊन आम्ही आठ दिवसात सर्वांचे पैसे परत करू असे सांगितले. परंतु नागरिकांनी सुधीर काळे यांना समोर बोलवा, आमचे पैसे परत करा, आरोपी वर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा आदी मागणी करीत सातपूर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले. रात्री उशिरा पर्यंत संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सातपूर पोलीस स्टेशन मध्ये सुरु होते