नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शिक्षिकेला गुंगीचे औषध पाजून केलेल्या अनैसर्गिक संबंधाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तिच्या शाळेतील बसचालकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित महिला ही 35 वर्षीय असून, तिला दोन मुले आहेत. पीडिता ही शरणपूर रोड परिसरातील एका शाळेत शिक्षिका होती, तर आरोपी हा 27 वर्षीय तरुण आहे. त्याच शाळेतील स्कूल बसवर चालक म्हणून काम करीत असून, तो विवाहित आहे. तो नेहमी या शिक्षिकेला व त्या भागातील मुलांना सोडण्यासाठी यायचा. चहा पिण्याच्या निमित्ताने त्याने तिच्याशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला.
पालकांना तुमचा नंबर हवा आहे, असे सांगत त्याने शिक्षिकेचा फोन नंबर मिळवून तिला मेसेज व फोन करणे सुरू केले. एक दिवस त्याने पिडीतेचे मुल शाळेत गेल्याची संधी साधत तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार करत फोटो काढले. सन 2023 ते दि. 7 जानेवारी 2025 या कालावधीत आरोपी बसचालकाने पीडिता काम करीत असलेल्या शाळेत पीडितेशी बळजबरीने ओळख करून घेत तिचा वेळोवेळी पाठलाग करायचा.
त्यादरम्यान आरोपीने पीडितेला शाळेमध्ये मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली. शरीरसुखाची मागणी करून पीडितेला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून पीडितेचा विनयभंग केला. त्याचप्रमाणे आरोपीने पीडितेच्या कामाच्या ठिकाणी तिची बदनामी करून तिला नोकरी सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने पीडितेच्या घरी येऊन तिला वेळोवेळी त्रास दिला, तसेच गुंगीकारक औषध पाजून फिर्यादीसोबत फोनमध्ये काढलेले फोटो हे नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी दिली.
एवढेच नव्हे, तर पीडितेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यामुळे पीडितेने अंबड पोलीस ठाणे गाठून प्रियकराविरुद्ध फिर्याद दिली असून, त्याच्यावर लैंगिक अत्याचारासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रौंदळे करीत आहेत.