राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे २८ डिसेंबर रोजी एका ३० वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, आता पोलिस तपासात त्याच्या आत्महत्येला त्याची बायकोच जबाबदार असल्याचे समोर आले आहे.आपल्या बायकोला दुसऱ्या पुरुषाबरोबर नको त्या अवस्थेत पाहून या तरुणाने गळफास घेतल्याचे समोर आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या पत्नीसह इतरांना अटक केली आहे. रमेश ऊर्फ रामा भाऊसाहेब गांगड (वय ३०) हा त्याच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील ताहाराबाद (कुरणवस्ती) येथे राहत होता. त्याने २८ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
त्याने गळफास घेण्यापूर्वी सर्व घटना एका चिठ्ठीत लिहून ठेवली.तसेच त्याच्या मोबाईलवर रेकॉर्ड करुन ठेवले. त्यानुसार रमेश याची पत्नी ताराबाई हिचे शेजारीच राहणारा रवी नामक तरुणाशी अनैतिक संबंध होते. रमेश ऊर्फ रामा याने अनेक वेळा त्याची पत्नी तारा व रवी यांना नको त्या अवस्थेत पाहिले होते. त्यानंतर आरोपींनी अनेक वेळा रमेश ऊर्फ रामा याला दमदाटी करुन मारहाण केली होती.
आरोपींच्या त्रासाला कंटाळून रमेश ऊर्फ रामा याने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच आरोपींना अटक झाली पाहिजे, असा मजकूर त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला आढळून आला आहे. रमेश ऊर्फ रामा याच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.
त्या फिर्यादीवरून आरोपी ताराबाई रमेश ऊर्फ रामा गांगड, रवी एकनाथ गांगड, सचिन एकनाथ गांगड, (रा. ताहाराबाद, ता. राहुरी) या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी एक आरोपी वगळता संबंधित पत्नी व तिचा प्रियकर आत्महत्या केल्यापासून फरार होते.
राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रविंद्र कांबळे, अविनाश दुधाडे यांच्या पोलिस पथकाने ताहाराबाद परिसरात आरोपींचा शोध घेतला. यातील एक आरोपी सचिन एकनाथ गांगड त्याला ताब्यात घेतले.
मात्र मुख्य आरोपी रवी गांगड व मयताची पत्नी ताराबाई गांगड हे दोघे पसार झाले होते. त्यांनतर त्यांच्या शोधार्थ राहुरी पोलिस पथके अनेक ठिकाणी रवाना झाले होते. पतीच्या दशक्रिया विधीनंतर म्हणजे गेल्या दहा दिवसांनंतर अनैतिक संबंधातील पत्नीचा पोलिसांनी शोध घेतला आणि तिला ताब्यात घेतले आहे.