नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहरातील अंबड येथील चुंचाळे परिसरात अन्न व औषध विभागाच्या पथकाने दोन विक्रेत्यांवर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर सुगंधित पानमसाला व गुटखा जप्त केला आहे.
याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील अंबड परिसरात असलेल्या चुंचाळे येथील भोर टाऊनशिपमध्ये बेकायदेशीर बंदी असलेला पानमसाला व गुटखा विक्री केला जात आहे.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी (दि. 7) दिवसभर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने पाळत ठेवून येथील सागर कोठावदे यांच्या राहत्या घरी छापा टाकून हिरा पानमसाला, विमल पानमसाला, वाह पानमसाला, सुगंधित तंबाखू असा सुमारे 26 हजार 158 रुपयांचा माल हा विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले.
तर याच परिसरातील सतीश सोनजे यांच्या राहत्या घरी शोध घेऊन छापा टाकला असता त्यांच्याकडेदेखील हिरा मसाल्याचे महापॅक, रॉयल सुगंधित तंबाखू, राजनिवास सुगंधित पानमसाला, झेडएल 01 जाफरानी जर्दा, केशरयुक्त विमल पानमसाला असा एकूण 1 लाख 20 हजार 870 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाल्याचा साठा हा विक्रीसाठी आणला असल्याचे समोर आल्याने याबाबत सर्व नमुने घेऊन ते विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.
या दोन्ही विक्रेत्यांकडे सुमारे 1 लाख 47 हजार 28 रुपयांचा साठा मिळाला असून, या विक्रेत्यांविरोधात अंबड पोलीस ठाण्यामध्ये अन्न व सुरक्षा अधिकारी संदीप तोरणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त म. ना. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त म. मो. सानप, संदीप तोरणे, सुवर्णा महाजन, गोविंद गायकवाड, अविनाश दाभाडे यांच्या पथकाने केली आहे.