नाशिक :- विंचूर गवळी – सैय्यदप्रिंप्री रोडवर पत्नीने भावाच्या मदतीने धारधार शस्त्राने आपल्या पतीचीच हत्या केल्याची घटना घडली आहे. भावसार पवार (वय 45) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे.
घटना घडल्यानंतर तेथील काही नागरिकांनी जखमीस तातडीने उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. हा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, भावसार पवारचे दोन लग्न झाले होते. पहिल्या पत्नीकडे भावसार जास्त राहायचा याचा राग दुसरीच्या मनात होता. तसेच तिला मुलबाळ होत नसल्याने दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. या रागातून तिने पतीचा काटा काढायचे ठरवले.
काल रात्री तिने भाऊ व इतर 2 जण यांच्या मदतीने त्याच्यावर चाकूने वार केले. आडगाव पोलिसांनी याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आडगाव पोलिसांनी हत्या करणाऱ्या पत्नीला ताब्यात घेतले असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.