नागपुरात एका मानसोपचार तज्ज्ञात दडलेला हैवान समोर आलाय. एका 45 वर्षीय मानसोपचार तज्ज्ञाला त्याच्याकडे समुपदेशनासाठी येणाऱ्या तरुणी आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मानसोपचार तज्ज्ञ गेले अनेक वर्ष नागपुरात समुपदेशन केंद्र चालवत होता. तो नागपूरसह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये त्या संदर्भातील शिबिरेही घेत होता. त्यामुळे त्याच्याकडे मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी करियर संबंधी अडचणींबद्दल समुपदेशन घ्यायला येत होते. त्यापैकीच काही अल्पवयीन मुली आणि तरुणींचे त्याने विविध आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे या काळ्या कृत्यात या मानसोपचार तज्ज्ञाची बायकोही त्याला साथ देत होती. या नराधमाविरोधात गुन्हा दाखल होऊन आता अधिक तपासासाठी एसआटीची स्थापना केली गेलीये.
महिलांच्या कमकुवत मानसिक स्थितीचा फायदा उचलत हा हैवान समुपदेशनाच्या नावाखाली त्यांचं लैंगिक शोषण करत होता. या मानसोपचार तज्ज्ञावर विश्वास ठेऊन काही विद्यार्थीनी करिअर गायडन्ससाठी त्याच्याकडे यायच्या. तर काही महिला मानसिक उपचार घेण्यासाठी. पण या मानसोपचार तज्ज्ञाने अल्पवयीन मुली आणि तरुणींचा लैंगिक छळ केला. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत या मानसोपचार तज्ज्ञाला पोक्सो आणि लैंगिक छळाच्या आरोपात अटक केलीये..
मानसोपचार तज्ज्ञाची काळीकृत्य बाहेर येण्यासाठी कारणीभूत ठरली ती नोव्हेंबर महिन्यातली एक घटना. या नराधमाने नोव्हेंबरमध्ये त्याच्याकडे 10 वर्षांपूर्वी समुपदेशनासाठी आलेल्या एका महिलेला तिचे काही आक्षेपार्ह फोटो पाठवले. या फोटांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.
या पीडित महिलेने हिम्मत दाखवत या महिलेने पोलिसात धाव घेतली. पोलिसांच्या तपासात या विकृत मानसोपचार तज्ज्ञाचा पर्दाफाश झाला. या मानसोपचार तज्ज्ञाच्या कार्यालयातून तपासादरम्यान एक हार्ड डिस्क जप्त झालीये. यातले अनेक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओज पोलिसांच्या हाती लागलेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी नागपूर पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे. सोबतच या डॉक्टरने जर कुणाचा लैंगिक छळ केला असेल तर धाडसाने समोर येत तक्रार देण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय.