नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने सापळा रचून चांदवड चौफुलीवर विदेशी मद्य व महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण 18 लाख 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, मद्यपुरवठादार व विकत घेणारे इसम फरारी झाले आहेत.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली अधिक माहिती अशी, की सिल्व्हासा-कपराडा-सुतारपाडा-राजबारी-पेठ-नाशिक मार्गे चांदवड चौफुली येथून एमएच 15 जेसी 8719 या क्रमांकाच्या बोलेरो पिकअप गाडीतून अवैधरीत्या प्रतिबंधित विदेशी मद्य जाणार असल्याची गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळाली होती.
त्यानुसार सापळा रचून परराज्यातील विदेशी मद्याचे 101 बॉक्स पथकाने जप्त केले आहेत.
या प्रकरणी जयदीप ऊर्फ गणेश तुळशीराम पवार (वय 30, रा. चिंचखेड रोड, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक) व त्याचा साथीदार सद्दाम सय्यद हेडी (वय 31, रा. उंबरठाण, ता. सुरगाणा, जि. नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक अ. सु. तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक पी. एम. गौडा, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, किरण धिंदळे, डी. बी. कोळपे, के. एस. गांगुर्डे, महेश सातपुते, युवराज रतवेकर, विलास कुंवर, राहुल पवार, धनराज पवार, सुनीता महाजन यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक करीत आहेत.