उपनगर हद्दीत चार दिवसांत दुसरा खून ; बाप उठला मुलाच्या जीवावर
उपनगर हद्दीत चार दिवसांत दुसरा खून ; बाप उठला मुलाच्या जीवावर
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- दारूच्या नशेत बाप लेकाच्या झालेल्या भांडणात बापाने स्वतःच्या मुलाला जीवे ठार मारले. उपनगर पोलीस ठाण्यात गेल्या चौथ्या दिवशी दुसऱ्या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत परिसरातील नागरिकांनी सांगितले की, अनिल विठ्ठल गुंजाळ (वय 20, रा. आम्रपाली झोपडपट्टी, उपनगर कॅनल रोड) असे बापाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. विठ्ठल गुंजाळ व त्यांचा मुलगा अनिल गुंजाळ यांचे रोज नशेमध्ये भांडण होत असत. गेल्या महिन्याभरात दहा ते पंधरा वेळा त्यांच्यात हाणामारी झाली होती.

काल रात्री बाप-लेक प्रचंड नशेत असताना त्यांच्यात वाद झाले. बापाने मुलगा अनिल याच्या डोक्यावर जड वस्तू मारल्याने तो  बेशुद्ध झाला. त्यास नागरिकांच्या मदतीने बिटको रुग्णालयात व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र आज सकाळी तो मयत झाला असल्याचे उपनगर पोलिसांनी सांगितले. हल्लेखोर बाप विठ्ठल गुंजाळ याला तत्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

अधिकचा तपास पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे करीत आहेत.

गंधर्व नगरी या ठिकाणी रविवारी संध्याकाळी एका आठ वर्षीय मतिमंद मुलावर अतिप्रसंग करून त्याचा खून केल्याची घटना घडली होती. पोलिसांच्या याबाबतचा तपास सुरू असतानाच दुसऱ्या खुनाचा गुन्हा घडला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group