धक्कादायक : नाशिकरोडला 8 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा खून
धक्कादायक : नाशिकरोडला 8 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा खून
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) - गंधर्व नगरीतील नवरत्न अपार्टमेंटच्या निर्माणाधीन इमारतीमध्ये एका आठ वर्षीय मतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनांनी परिसरात शोककळा पसरली आहे.

ओम सुरेश दुधाट (वय ०८) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. ओमचे आई-वडील गंधर्व नगरीतील श्री बालाजी मंदिराजवळ असलेल्या नवरत्न अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून काम करत आहेत. दिवसभर त्यांचे वडील मोलमजुरीचे काम करतात, तर त्यांची आई कुटुंबाचा उदरनिर्वाह धुणे भांडे करून चालवते. रात्रीचे वेळी हे कुटुंब नवरत्न अपार्टमेंटमधील तात्पुरत्या रूममध्ये राहात होते.

ओम हा आठ वर्षांचा मुलगा काल संध्याकाळी अचानक घरातून गायब झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला जात असताना रात्री उशिरा त्याचा मृतदेह इमारतीच्या डगमध्ये सापडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे आणि गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्यासह पोलिसांचा एक मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले की, ओमचा मृतदेह डगमध्ये सापडला असून, त्याच्या पाठीमागील बरगड्या तुटलेल्या आढळल्या आहेत, यावरून त्याला उंचावरून फेकले गेले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ओमवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली असून, आरोपींच्या शोधासाठी तीन तुकड्यांना रवाना करण्यात आले आहे. पोलिसांनी इमारतीच्या आसपासच्या CCTV कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे आणि संदिग्ध व्यक्तींना शोधण्यासाठी पोलिसांचे पथक सक्रिय आहे.

सोमवारी संध्याकाळी ओमच्या मृतदेहाची देवळाली गाव येथील अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ओमच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरातील प्रत्येकाची मनं शोकग्रस्त झाली आहेत.

या घटनेने एकच खळबळ माजवली आहे आणि संबंधित आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी बालाजी सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष कैलास मुदलियार भाजपा मंडल अध्यक्ष शांताराम घंटे,रोहन देशपांडे,प्रवीण नागरे,बापू सापुते आदी सह स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group