मुंबईतील अंधेरी भागात भाजपाच्या माजी खासदाराच्या पुतण्याने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार संगमलाल गुप्पा यांच्या २१ वर्षीय पुतण्याने मंगळवारी (१५ ऑक्टोबर) दुपारी मुंबईत आत्महत्या केली आहे. या तरुणाने तो वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. अंधेरी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचं नाव सागर रामकुमार गुप्ता असं आहे. सागर मुंबईत अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता. तो कुटुंबासह अंधेरी पूर्वेकडील अंबुजवाडी परिसरातील हरी दर्शन इमारतीच्या सातव्या मजल्यावर राहत होता.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, “सागर दुपारी महाविद्यालयातून घरी परतला. त्याने घरी आल्यावर कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी बातचीत केली नाही. त्यानंतर तो सहाव्या मजल्यावरील ‘डक्ट एरिया’त गेला. तिथून त्याने खाली उडी मारली. काही पादच्याऱ्यांनी त्याचा मृतदेह पाहून आरडाओरड केली. तसेच त्यांनीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि ते सागरला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला उपचारांसाठी दाखल करून घेण्याआधी तपासलं आणि मृत घोषित केलं.
आत्महत्येचं कारण काय?
पोलिसांनी सांगितलं की त्यांना सुसाइड नोट किंवा तत्सम संदेश मिळालेला नाही. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. अंधेरी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश यांनी सांगितलं की “मृत तरुण उत्तर प्रदेश भाजपामधील वरिष्ठ नेते तथा माजी खासदार संगमलाल गुप्ता यांचा पुतण्या होता. सागरच्या आत्महत्येचं कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी सागरच्या महाविद्यालयात चौकशी सुरू केली आहे. तसेच त्याचे मित्र व शिक्षकांची चौकशी केली जाणार आहे. सागर नौराश्यात (डिप्रेशन) होता का? याबाबत जाणून घेण्यासाठी पोलीस सागरच्या मित्रांशी संवाद साधणार आहेत.