दाजीने उसनवार पैसे परत केले नाहीत म्हणून मेहुण्याची तणावातून आत्महत्या
दाजीने उसनवार पैसे परत केले नाहीत म्हणून मेहुण्याची तणावातून आत्महत्या
img
Prashant Nirantar

नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नातेसंबंधात दाजीसह एकाला हातउसनवार दिलेले अनुक्रमे 3 लाख 50 हजार व पाच लाख रुपये वारंवार मागूनही परत मिळत नसल्याच्या तणावातून एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कोमल भरत गांगुर्डे (रा. आंबेडकरनगर, वरचे चुंचाळे, अंबड) यांचे पती भरत गोविंद गांगुर्डे यांनी त्यांचे दाजी कृष्णा शिंदे व अन्य नातेवाईक राजेंद्र पवार यांना त्यांच्या वैयक्तिक कामासाठी काही दिवसांपूर्वी अनुक्रमे 3 लाख 50 हजार रुपये व पाच लाख रुपये हातउसनवार दिले होते. आरोपी शिंदे व पवार यांनी ठरलेल्या मुदतीत फिर्यादीचे पती भरत गांगुर्डे यांना पैसे परत केले नाहीत.

त्यानंतर गांगुर्डे यांनी दाजींसह इतर अन्य आरोपींकडे पैशांची मागणी केली; मात्र त्यांनी गांगुर्डे यांना पैसे न देता उलट त्यांच्याशी भांडण करून त्यांना धमकी दिली. त्या ताणतणावातून दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास फिर्यादी यांचे पती भरत गांगुर्डे यांनी राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

भरत गांगुर्डे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृताचे दाजी कृष्णा शिंदे व राजेंद्र पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group