वैभव देवरेने हॉटेल व्यावसायिकाकडे मागितली २५ लाखांची खंडणी
वैभव देवरेने हॉटेल व्यावसायिकाकडे मागितली २५ लाखांची खंडणी
img
Prashant Nirantar

नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- हॉटेल व्यावसायिकाला व्याजाने दिलेल्या पैशाची परतफेड करूनही त्यांच्याकडे 25 लाख रुपयांची बेकायदेशीर खंडणी मागणारा खासगी सावकार वैभव देवरे आणि त्याचा साला निखिल पवार यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सचिन विलास बरडे (रा. इंदिरानगर, नाशिक, मूळ रा. काळेवाडी, जि. अहमदनगर) हे हॉटेल व्यावसायिक असून, ते खरेदी-विक्रीचे काम करतात. त्यांचे आई-वडील, पत्नी, दोन मुले हे सर्व जण गावी राहतात. बर्डे यांनी सन २०२० मध्ये बॉबी काळे यांच्याकडून पाच वर्षांकरिता भाडेतत्त्वावर इंदिरानगर येथे पेठेनगर कॉर्नरला असलेले हॉटेल कंदुरी हे चालविण्यासाठी घेतले. या हॉटेलमध्ये शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळत असल्याने बरेचसे ग्राहक येत होते.

त्यातून ओळखी वाढत गेल्या. सन २०२१ पासून हॉटेलमध्ये आरोपी वैभव यादवराव देवरे हा त्याच्या कुटुंब व त्याच्या मित्रांसह नियमित जेवणासाठी येत होता. त्यातून गप्पा मारल्यानंतर त्याच्याशी ओळख झाली. सन २०२२ मध्ये फिर्यादी बरडे यांना जमीन खरेदीसाठी पैशांची गरज होती. त्यासाठी कुठून पैसे मिळतील, याचा ते शोध घेत होते. त्यादरम्यान वैभव देवरे हा हॉटेलमध्ये जेवायला आला असता त्याने "मी व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करतो. तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील, तर शेकडा दहा टक्के व्याजदराने पैसे देईन,” असे सांगितले. त्यानंतर फिर्यादींना चार लाख रुपयांची गरज असल्याने देवरे याने पैसे देण्यास होकार दिला.

त्यानंतर २२ मार्च २०२२ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास खासगी सावकार वैभव देवरे व त्याचा साला निखिल नामदेव पवार हे दोघे एका कारने हॉटेल कंदुरी येथे चार लाख रुपये घेऊन आले. ते पैसे बरडे यांना देत असताना त्यातून पहिल्या महिन्याचे व्याज म्हणून ४० हजार रुपये अ‍ॅडव्हान्स म्हणून कापून घेत फिर्यादी बरडे यांच्या हातात प्रत्यक्षात ३ लाख ६० हजार रुपये दिले. हे पैसे घेतल्यानंतर दरमहा बरडे हे व्याजाचे पैसे फोन पे अथवा रोख स्वरूपात वैभवकडे किंवा त्याचा साला निखिलकडे देत होते. एप्रिल ते ऑगस्ट २०२२ पर्यंतच्या व्याजाची रक्कम म्हणून एकूण २ लाख रुपयांची नियमितपणे परतफेड केली; मात्र फिर्यादी बरडे यांना हॉटेलच्या कामासाठी पुन्हा आर्थिक अडचण आली. म्हणून त्यांनी दि. ४ सप्टेंबर २०२२ रोजी वैभव देवरे याच्याकडे पुन्हा एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी वैभव देवरे स्वत: एक लाख रुपये घेऊन हॉटेलवर देण्यासाठी आला.

ही रक्कम देताना पहिल्या महिन्याचे अ‍ॅडव्हान्स व्याज कापून त्याच्या हातात ९० हजार रुपयांची रोकड दिली. फिर्यादी बरडे हे खासगी सावकार देवरे व निखिल पवार यांना दोन्ही आर्थिक व्यवहारांचे प्रत्येक महिन्याला ५० हजार रुपयांप्रमाणे ऑक्टोबर २०२२ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन व रोखस्वरूपात एकूण ८ लाख ५० हजार रुपये दिले. पैसे देताना व्याजापोटी अ‍ॅडव्हान्स म्हणून कापून घेतलेले दोन्ही व्यवहारांचे ५० हजार असे मिळून एकूण नऊ लाख रुपये व्याज म्हणून दिले आहेत. फेब्रुवारी २०२४ नंतर हॉटेलमालक बरडे यांची आर्थिक स्थिती खराब झाली.

त्यानंतर फिर्यादी व्याजाचे पैसे देऊ शकले नाहीत, म्हणून आरोपी देवरे व पवार यांनी त्यांच्याकडे व्याजाच्या पैशाची मागणी केली. ते पैसे दिले नाहीत म्हणून फिर्यादींना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. व्याजाचे पैसे दिले नाहीत म्हणून त्यांनी दरदिवशी ५० हजारांचा दंड लावला व व्याजाने दिलेल्या पैशांपोटी पाच लाख रुपयांची बेकायदेशीररीत्या खंडणी मागितली.

त्यानंतर एके दिवशी हॉटेल बंद करीत असताना आरोपी देवरे तेथे आला व त्याने व्याजाच्या पैशाची मागणी करून दमबाजी केली, तसेच त्याच्या साल्याने लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी बरडे यांनी मित्रपरिवार व नातेवाईकांकडून हातउसनवार करून पाच लाख रुपये जमा केले व ते देवरे याला दंड म्हणून दिले. त्यानंतर दहा लाख, पाच लाख व पुन्हा पाच लाख याप्रमाणे रक्कम टाकलेली सही करून तीन चेक बळजबरीने लिहून घेतले.

त्यानंतर संपूर्ण आर्थिक देवाणघेवाणीचे प्रकरण मिटवायचे असेल, तर आरोपी वैभव देवरे व निखिल पवार यांनी बरडे यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. अशा वारंवार मिळणार्‍या धमक्यांमुळे बरडे हे हॉटेल बंद करून गावी निघून गेले. त्यानंतर वैभव देवरे याने फिर्यादी यांना शोधून काढले व त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या देऊन खंडणीची मागणी केली.

देवरे व त्याचा साला निखिल पवार यांच्या धमक्यांना घाबरून फिर्यादी बरडे हे त्यांच्या कुटुंबीयांसह पुणे येथे राहण्यासाठी गेले; मात्र तेथेही जाऊन देवरे व पवार यांनी पैशांची मागणी करून धमकी दिली. या त्रासाला कंटाळून अखेर सचिन बरडे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खासगी सावकार वैभव देवरे व त्याचा साला निखिल पवार यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group