नाशिकचे जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत, मुलगा असल्याचे सांगून ताब्यात दिली मुलगी
नाशिकचे जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत, मुलगा असल्याचे सांगून ताब्यात दिली मुलगी
img
Dipali Ghadwaje

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला मुलगा झाल्याची नोंद करीत प्रत्यक्षात नातेवाईकांच्या ताब्यात मुलगी दिली.

यामुळे नातेवाईक संतप्त झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्वांची धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा रुग्णालय कोणत्या ना कोणत्या घटनेवरून राज्यात गाजत आहे. नांदूर नाका येथील रहिवासी रुतिका पवार हिने रविवारी रात्री एका मुलास जन्म दिला. बाळाचे वजन कमी असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. बाळाच्या पोटात पाणी असल्याचे उपचार करताना लक्षात आले.

त्यामुळे त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्याचे तेथील डॉक्टरांनी सुचविले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पालकांनी डिस्चार्ज घेतला. त्याचे डायपर बदलत असताना हा सर्व झालेला प्रकार लक्षात आला. मुलगा असल्याचे सांगून तेथील परिचारिकेने दिशाभूल केली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला; मात्र डिस्चार्ज पेपर मुलगा असल्याचीच नोंद होती. या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयातील वरिष्ठांना याबाबत विचारणा केली. ते जिल्हा शल्यचिकित्सक शिंदे यांनाही भेटले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते अनिल भडांगे यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group