राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, सर्वपक्षीय नेते जोरदार तयारीला लागले आहेत. पक्षांच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. दरम्यान नाशिक मधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले असून या गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेल्या सावता नगर परिसरात वाद झाला असून मतदारांना स्लीप वाटण्यावरून भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे .
दरम्यान, बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झालेय यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले आहे. एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याबाहेर जमले आहे. दोन्ही समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. भाजप आणि ठाकरे गटाच्या दोन्ही समर्थकांची अंबड पोलीस ठाणे बाहेर मोठे गर्दी उसळली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सुधाकर बडगुजर यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे. भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी या कार्यकर्त्यांची चौकशी केली असता वाद झाला. सुधाकर बडगुजर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहे. पैसे वाटप होत असल्याचा खोटा आरोप करून कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची बडगुजर यांनी तक्रार केली आहे. तर मुकेश सहाने यांच्यावर गोळीबार झाल्याचीही सहाणे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. मुकेश सहाणे यांच्या प्रदीप चव्हाण नामक कार्यकर्त्याला मारहाण झाली आहे. या मारहाणीत प्रदीप चव्हाण हा कार्यकर्ता जखमी झाला आहे.