शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सदाभाऊ खोत यांना बसला धक्का ; काय घडले?
शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सदाभाऊ खोत यांना बसला धक्का ; काय घडले?
img
Dipali Ghadwaje
ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाने रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे. रयत क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी नुकतंच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. पांडुरंग शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. जळगावमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पांडुरंग शिंदे यांनी रयत क्रांती संघटना सोडण्यामागचे कारणही सांगितले.

काय म्हणाले पांडुरंग शिंदे?

“सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर टीका केली होती. पण मला ही टीका पटली नाही. त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला”, असे पांडुरंग शिंदे यांनी सांगितले. “सध्या सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून लांब गेलेले आहेत. त्यांचे काम व्यक्ती केंद्रीत झाले आहे”, अशी टीका पांडुरंग शिंदे यांनी केली.

सध्या सदाभाऊ खोत यांच्या विषयी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. माझ्या संपर्कात जिल्ह्यातील 25 कार्यकर्ते आहे. तेदेखील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील असा दावा पांडुरंग शिंदे यांनी केला आहे. ऐन विधानसभेत रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का बसला आहे.

सदाभाऊ खोत काय म्हणाले होते?

सांगलीतील जतमधील परिसरात एका प्रचारसभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावेळी देवेंद्र फडणवीसदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. “देवेंद्र फडणवीस म्हणाले गायीचं सगळं दूध वासरांनाच देणार. मग शरद पवारांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या. ते म्हणाले माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांचं कसं होणार? शरद पवार साहेब, तुमच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी कारखाने, बँका, सूत गिरण्या लाटल्या. पण त्यांना मानावं लागेल की एवढं करून आता म्हणतात मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा हवाय का?” असं सदाभाऊ खोत म्हणाले होते. एका वृत्त संस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group