विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला ऐतिहासिक विजय प्राप्त झाला असून दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला, दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीसाठी पक्षाला गळती लागली आहे. महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी आतापर्यंत महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे.
याचदरम्यान, आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. फडणवीसांना निवेदन देण्यासाठी भेटल्याचं सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं, मात्र दुसरीकडे ठाकरेंसोबत कोण राहणार? कोण जाणार? असं सूचक विधान या भेटीवर मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात भूकंप होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमिनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. ते नाशिकला आले संघटत्माक गोष्टींवर चर्चा करून गेले. आता तुम्ही बघा या आठ दिवसांमध्ये त्यांच्याकडे कोण राहील आणि कोण जाईल ते? या मणसाच्या बडबडीमुळे यांच्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत. मला वाटतं स्वत: उद्धवजीही परेशान असतील, सध्या ते आऊट ऑफ कंट्रोल झालेले आहेत, असं म्हणत, गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.