आज राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली झाली. दरम्यान राज्यात काही ठिकाणी मतदानकेंद्रावर गोंधळ निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान अशीच एक घटना अहमदनगर येथील पाथर्डी परिसरात घडली आहे. अहमदनगरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पाथर्डीच्या आमदार आणि भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मात्र राजळे यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने या संदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनला करण्यात आली नव्हती.
आमदार मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रकार आज सायंकाळी तालुक्यातील शिरसाठवाडी येथील मतदान केंद्रावर झाला. तर आक्रमक जमावापासून बचाव व्हावा म्हणून राजळे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतःला मतदानकेंद्राच्या खोलीत कोंडून घेतले. उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेत दोन तास मतदानकेंद्रात बसून असलेल्या राजळे यांची सुटका केली तर या घटनेने संतप्त झालेल्या हजारो राजळे समर्थकांनी रात्री शहरातील माणिक दौंडी चौकात रास्तारोको आंदोलन सुरु केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत राजळे आणि त्यांचे चार समर्थक किरकोळ जखमी झाले आहे.
दरम्यान , आज सायंकाळी मोनिका राजळे या शिरसाठवाडी मतदानकेंद्रावर वाद सुरु असल्याचे समजल्यावर त्या ठिकाणी गेल्या असता तेथे शेकडो युवक जमा झाले आणि त्यांनी राजळे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. पोलिसांनी या तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसदल अपुरे असल्याने उपयोग झाला नाही. या नंतर राजळे यांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. ती चालू असतानाच राजळे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदानकेंद्राच्या खोलीत नेले. या वेळी मतदानप्रक्रिया संपलेली होती.