बारामती विधानसभेच्या निवडणुकीवर यंदा संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.अशातच अजित पवार यांची बारामतीमध्ये आज प्रचाराची सांगता सभा झाली. या सभेसाठी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवारही उपस्थित होत्या.
लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीनंतर आता विधानसभेला पुन्हा युगेंद्र पवार आणि अजित पवार हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार आठव्यांदा मैदानात आहेत.
मात्र यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी अटीतटीची असणार आहे. मागच्यावेळी तुम्ही मला मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं, सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी या सभेत आपण केलेल्या कामांचा पाढा वाचला.
"टेक्सटाईल पार्कमध्ये घडलं आवडलं नाही"
काल जे टेक्सटाईल पार्कमध्ये जे घडलं ते मला आवडलं नाही. काकी माझ्या आईसारख्या आहेत. एवढ्या खालच्या पातळीला जाऊ नका ना, त्यातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करु नका असं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मागच्या वेळी मी एकटा पडल्यासारखं झालं होतं, पण यंदा माझ्यासोबत माझी आई, बहिणी, पत्नी, माझ्या सोबत आहेत असं म्हणत अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
या निवडणुकीत कुणीही भावनिक होऊ नका, आपल्याला काम करायचंय. बारामतीत गुंडगिरी, दहशत चालू देणार नाही, गुन्हा केला की, त्याला टायरमध्ये टाकायचं, नाहीतर तडीपार करायचं असं म्हणत अजित पवार यांनी इशाराही दिला.