उद्या राज्यात एकाच टप्पयात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. पक्षांचे प्रचार संपले आहेत. तसेच, सर्वांचे लक्ष आता उद्या होणार असणाऱ्या निवडणुकांकडे आहे. दरम्यान,बारामतीमध्ये सोमवारी रात्री मोठी घडामोड घडली आहे. युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांनी शोध मोहीम राबवली. बारामती मतदारसंघात अजित पवार यांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले आहे.
अजित पवार यांचे बंधू आणि युगेंद्र यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्सच्या बारामती शोरूम मध्ये रात्री पोलिसांनी शोध मोहिम केली. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना या शोरुममध्ये काय सापडलं, नेमकं कोणत्या कारणाने ही शोध मोहीम राबवण्यात आलाी, याची माहिती समोर आली नाही. मात्र, या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी म्हटले की, 'रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शो रुम ऑफिसमधून फोन आला. त्यावेळी आपल्याकडे पोलिसांचे एक पथक आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावर मी पोलिसांना सहकार्य करण्याची सूचना तेथील कर्मचाऱ्यांना दिली. आम्ही काहीच चुकीचं करत नव्हतो, त्यामुळे पोलिसांना काहीच सापडलं नाही. शरद पवार यांनी संबोधित केलेल्या सांगता सभेला आलेली गर्दी पाहून काहीजण बिथरले असावेत. पण, बारामतीचं राजकारण या पातळीवर आलं असेल तर दुर्देव आहे.'