राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्रिपद न मिळालेल्या नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. दरम्यान आता महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली असून यावरूनही पद न मिळालेले मंत्री कमालीचे नाराज असल्याचे चित्र आहे. दरम्यान पालकमंत्रिपदावरून आता महायुतीमध्ये जुंपल्याची पाहायला मिळत आहे.
पालकमंत्रिपदाची यादी जाहीर करण्यात आली. मात्र या यादीमध्ये शिवसेना नेते भरत गोगावले आणि दादा भुसे यांना स्थान देण्यात आलं नाही. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदे नाराज झाल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली. मात्र आधी पालकमंत्री म्हणून ज्यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं, तेच या वेळी 26 जानेवारीला ध्वजारोहन करणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील भरत गोगावले यांचे समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी राजीनामे दिले असल्याची बातमी समोर येत आहे. जोपर्यंत भरत गोगावले हे पालकमंत्री होणार नाहीत तोपर्यंत आम्ही काम करणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे.
दरम्यान दुसरीकडे भरत गोगावले यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे. राज्यात कोणतच सीट निवडून आलं नाही, मात्र रायगडचा किल्ला राखण्यात यश आलं. आम्ही तिघांनी केलेल्या प्रयत्नामुळे सुनील तटकरे निवडून आले, मात्र त्यांनी तिघांना पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप गोगावले यांनी केला आहे, गोगावले यांच्या आरोपांनंतर आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.