वक्फ बोर्ड  जेपीसी बैठकीत  राडा !  अरविंद सावंत यांच्यासह १० विरोधी खासदार निलंबित, नेमकं काय घडलं ?
वक्फ बोर्ड जेपीसी बैठकीत राडा ! अरविंद सावंत यांच्यासह १० विरोधी खासदार निलंबित, नेमकं काय घडलं ?
img
दैनिक भ्रमर
वक्फ विधेयकावरील सयुंक्त संसदीय समितीच्या बैठकीत आज राडा झाला. दरम्यान शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह विरोधी पक्षांच्या १० खासदारांचे निलंबन करण्यात आले. निलंबित करण्यात आलेल्या विरोधी खासदारांमध्ये कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए राजा, असदुद्दीन ओवैसी, नासिर हुसेन, मोहिबुल्लाह, एम. अब्दुल्ला, अरविंद सावंत, नदीमुल हक, इम्रान मसूद यांचा समावेश आहे.

शुक्रवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात जोरदार वादावादी झाली. काही वेळातच सभेत गदारोळ सुरू झाला. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून १० खासदारांचे समितीच्या सदस्यत्वावरून निलंबन करण्यात आले. बैठकीत झालेल्या गोंधळानंतर, वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ वरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीतून सर्व १० विरोधी खासदारांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. 

भाजपाचे खासदार जगदंबिका पाल हे या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले की, आज आम्ही जम्मू-काश्मीरमधील शिष्टमंडळ मीरवाईज उमर फारूक यांच्या शिष्टमंडळाला त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळ दिला होता. मात्र संसदेत विधेयकाच्या चर्चेत सहभागी न होणारे असदुद्दीन ओवेसी आज मात्र चर्चेत सहभागी झाले. तसेच तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी माझ्याशी असभ्य वर्तन करत असंसदीय भाषा वापरली. मी त्यांना शांत करण्याचे आवाहन करत होतो. पण ते ऐकायला तयार नव्हते. अखेर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी खासदारांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव दिला.

आजच्या बैठकीची सुरुवात गोंधळाने झाली. विरोधी पक्षातील खासदारांनी आरोप केला की, त्यांना विधेयकात जे बदल सुचविले आहेत, त्या नव्या मसुद्याचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला नाही. काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांचे संसदीय समितीमधून निलंबन झाल्यानंतर त्यांनी म्हटले की, सरकारला वक्फच्या मालमत्तांवर नियंत्रण हवे आहे.

टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले की, बैठकीत अघोषित आणीबाणी सुरू असल्यासारखे वातावरण आहे. अध्यक्ष बैठकीत कोणाचेही ऐकून घेत नाहीत. आम्हाला सांगण्यात आले होते की, २४ आणि २५ जानेवारी रोजी बैठक होईल. आता, आजच्या बैठकीसाठी, अजेंडा कलमानुसार चर्चेतून बदलण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group