वर्ल्ड  इकॉनॉमिक फोरममध्ये घडला इतिहास !  रिलायन्स आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार, ''इतक्या'' कोटींची महाराष्ट्रात करणार गुंतवणूक
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये घडला इतिहास ! रिलायन्स आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार, ''इतक्या'' कोटींची महाराष्ट्रात करणार गुंतवणूक
img
दैनिक भ्रमर
रिलायन्स आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार झाला असून  ३ लाख ५ हजार कोटींची गुंतवणूक रिलायन्स महाराष्ट्रात करणार आहे. एकूण ३ लाख रोजगार निर्मिती गुंतवणुकीतून होणार आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने दुसऱ्या दिवसापर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल. 

दावोसमध्ये 22 जानेवारी रोजी झालेल्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा आहे. यामध्ये पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समुहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, दुसरी मोठी गुंतवणूक ही अॅमेझॉन करणार असून, ती 71,795 कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून 83,100 इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या 2 दिवसांत जे सामंजस्य करार झाले, त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने 11.71 कोटींचे करार केले असून, एमएमआरडीएने 3.44 लाख कोटी तर सिडकोने 55,200 कोटींचे करार केले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group