महाराष्ट्र संघाच्या भेदक माऱ्यापुढे बडोदा संघ गडगडला; महाराष्ट्र संघ
महाराष्ट्र संघाच्या भेदक माऱ्यापुढे बडोदा संघ गडगडला; महाराष्ट्र संघ "इतक्या" धावांनी आघाडीवर
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- बीसीसीआयतर्फे सुरु असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध बडोदा  रणजी ट्रॉफीत, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या अफलातून जलदगती गोलंदाजीने बाजी पलटवली व पहिल्या डावातील महाराष्ट्राच्या आघाडीच्या फलंदाजांना आलेले काहीसे अपयश धुवून काढले व क्रिकेट रसिकांची नाराजी काही प्रमाणात दूर केली आहे. महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावात २ बाद १२३ धावा आल्या असून डावखुरा सिद्धेश वीर नाबाद ३७ व कर्णधार ऋतुराज गायकवाड  नाबाद ६६ यांच्या ९८ धावांची अतूट  दमदार भागीदारी झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या  दिवसअखेर महाराष्ट्र २७५ धावांनी आघाडीवर आहे.

कालच्या ७ बाद २५८ या धावसंख्येत आज पहिल्या तासात ३९ धावांची भर घालून महाराष्ट्राचा पहिला डाव २९७ धावांवर संपला. यष्टीरक्षक सौरभ नवलेने सर्वाधिक ८३ धावा केल्या. मुकेश चौधरीने नाबाद  १२ धावा केल्या. तर बडोदाच्या जलदगती अतित सेठने  ६ बळी घेतले.  

बडोदाच्या डावाच्या सहाव्याच षटकात मुकेश चौधरीने सलामीची जोडी फोडली. १ बाद १०. यश क्षीरसागरच्या थेट फेकीने लगेचच दुसरे यश मिळाले २ बाद १३. रजनीश गुरबानीने ९ व्या षटकात ३ बाद १४ व पाठोपाठ ४ बाद १४ असा दुहेरी धक्का दिला. असे सुरुवातीलाच महाराष्ट्राने बडोदा संघास जोरदार धक्के दिले.  उपाहाराची स्थिती : बडोदा १५ षटकांत ४ बाद २८. 

उपाहारानंतर पहिल्याच चेंडूवर रामकृष्ण घोषने ५ वा धक्का दिला. ५ बाद २८. कर्णधार कृणाल पंड्याने  यष्टीरक्षक मितेश पटेलसह ७ षटकात आक्रमक ३८ धावा जोडल्यानंतर रामकृष्ण घोषने कृणाल पंड्याला १२ धावांवर त्रिफळाचीत करत बडोदा संघास मोठा धक्का दिला. २२ व्या षटकात ६ बाद ६६. त्यानंतर परत मुकेश चौधरीने दुसरा बळी घेतला ७ बाद ७५. त्यानंतर मितेश पटेलसह आक्रमक महेश पिठीयाने ३६ धावा फटकावत डावातील ५१ धावांची सर्वोच्च भागीदारी केली. हितेश वाळूंजने  त्याचा अडसर दूर केला. 

८ बाद १२६. त्यानंतर सर्वाधिक ६१ धावा करणाऱ्या यष्टीरक्षक मितेश पटेलला बाद करून मुकेश चौधरीने आपला ३ रा बळी घेतला. सिद्धेश वीरने पहिल्याच चेंडूवर बळी टिपून पाहुण्यांना जेमतेम पावणे दोन सत्रांच्या खेळात केवळ ३३.१ षटकातच १४५ धावात तंबूत पाठवले. या प्रभावी गोलंदाजीने महाराष्ट्र संघाने १५२ धावांची आघाडी घेतली. मुकेश चौधरीने ३, रजनीश गुरबानीने व रामकृष्ण घोषने प्रत्येकी २ तर हितेश वाळूंज व सिद्धेश वीरने प्रत्येकी १ बळी घेतला.

महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावात पहिल्याच षटकात डावखुऱ्या लुकमान मेरीवालाने पवन शाहला शून्यावर बाद केले. मुर्तुझा ट्रंकवालालाही त्यानेच १८ धावांवर परत पाठवले  १२ व्या षटकात २ बाद २५. त्यानंतर मात्र डावखुरा सिद्धेश वीर व कर्णधार ऋतुराज गायकवाडने बडोदा संघास अधिक यश मिळू दिले नाही. सर्वच गोलंदाजांना सहज खेळत या नाबाद जोडीने १७ षटकात आक्रमक ९८ धावा जोडल्या. यात नैसर्गिक आक्रमक फलंदाजी करत ९ चौकार व २ षटकारांसह ऋतुराज ५४ चेंडूत नाबाद ६६ तर सिद्धेश ८३ चेंडूत ४ चौकार व १ षटकारासह नाबाद ३७ वर खेळत आहे. उद्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र  संघ आपली २७५ धावांची आघाडी किती वाढवतो ते बघूया.
इतर बातम्या
Join Whatsapp Group