विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा अलर्ट झाली असून पोलीस कर्मचाऱ्यांसह निवडणूक आयोगाचेही कर्मचारी डोळ्यात तेल घालून काम करत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे धाराशीवला जात असताना आज पुन्हा एकदा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.
शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग काल वणी येथे निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आली होती. बॅग तपासणी करण्यात आल्याने ते चांगलेच संतापले होते , त्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची बॅग तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच, त्यांचे आयडी आणि अपॉईंटमेंट लेटरही दाखवण्याचं बजावलं. या घटनेचा व्हिडिओ स्वत: उद्धव ठाकरेंनी शुट केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
औसा येथील हेलीपॅडवर ही तपासणी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकरदेखील होते. काल जालना येथे दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती.
उद्धव ठाकरे यांची बार्शी शहरात सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उद्या धाराशिव जिल्ह्यात दोन प्रचार सभा होणार आहेत. उमरगा विधानसभेचे ठाकरेंचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्यासाठी लोहारा येथे एक वाजता तर धाराशिव विधानसभेचे उमेदवार कैलास पाटील यांच्यासाठी धाराशिव शहरात सायंकाळी सात वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.
वणी येथेही तपासल्या होत्या बॅगा
उद्धव ठाकरे काल यवतमाळमधील वणी येथे प्रचारसभेसाठी असतानाही त्यांच्या बॅगांची तपासणी झाली होती. हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताच निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या. यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच संतापले होते. त्यांनी यासंदर्भातील व्हिडीओदेखील शूट केला होता. तसंच निवडणूक अधिकाऱ्याला तुम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याही बॅग तपासा आणि व्हिडीओ शूट करुन मला पाठवा असं सांगितलं होतं.
दरम्यान राज्यभरातून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. मात्र, आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संतापले आहेत.