"......तर मी दहावेळा जेलमध्ये जायला तयार आहे" - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण येथील शिंदे गटाचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

दरम्यान "लाडक्या बहिणींसाठी मी एक वेळा नाही तर दहावेळा जेलमध्ये जायला तयार आहे" असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. कार्यालयाच्या उद्घाटनाला इतके कार्यकर्ते असतील तर प्रचाराला किती असतील, याचा विचार करा. एवढे कार्यकर्ते समोरच्याच डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाहीत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेचा देखील उल्लेख करत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

"लाडक्या बहिणी इथे आहेत. लाडक्या भावांपेक्षा आता लाडक्या बहिणीच दिसत आहेत. माझ्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार. भाऊबीज झाली. आता भाऊबीज दरवर्षी नाही तर दर महिन्याला मिळणार आहे. हे खातं सुरू ठेवायचं आहे ना? विरोधी पक्ष हे बंद करण्याच्या मागे लागले आहेत. ते म्हणाले, महाविकास आघाडीचं सरकार आलं की ज्या योजना सुरू केल्या, ११ योजना आपण सुरू केल्या. या ११ योजनांची चौकशी सुरू करणार.

यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत, ज्यांनी सुरुवात केली म्हणजे आम्ही... त्या सर्वांना जेलमध्ये टाकणार. चालेल तुम्हाला? या माझ्या लाडक्या बहिणींसाठी हा तुमचा लाडका भाऊ एक वेळा नाही तर दहा वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. हे लोक लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले... कोर्टाने थप्पड दिली आता महाविकास आघाडीवाले नागपूरमध्ये दुसऱ्या कोर्टात गेले आहेत असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group