मोठी बातमी! राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी होणार ; शासनाचा नवा आदेश जारी
मोठी बातमी! राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी होणार ; शासनाचा नवा आदेश जारी
img
Dipali Ghadwaje
राज्यात मृत पाळीव प्राण्यांना इतरत्र टाकले जाते त्यामुळे परिसरात दुर्गंधी व आजार  पसरते मात्र यावर आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार आता सर्व मृत पाळीव प्राण्यांना अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.

या संदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळामध्ये प्रश्न विचारून पाठपुरावा केला होता.त्यांच्या प्रयत्नांना या निर्णयामुळे यश आल्याचे दिसून येते.

कुत्रे, मांजर, पांढरे उंदीर इतर गोवंशीय पाळीव प्राणी यांची वयोमर्यादा कमी असते. मृत्यूनंतर या प्राण्यांच्या शरीराची योग्य विल्हेवाट न केल्यास, दुर्गंधी पसरून रोग -राई पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागते.

या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना नगरविकास विभागाने दिलेल्या आहेत. तसेच या संदर्भात मार्गदर्शक सूचना आखलेल्या असून त्याच्या अंमलबजावणी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी असे स्पष्ट केले आहे.

पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याचा पहिला प्रयोग मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये करण्यात येत आहे.

या दोन्ही महापालिकेच्या हद्दीतील स्मशानभूमी जवळ असलेल्या राखीव जागेमध्ये गॅस सौदाहिनीच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी संयंत्र बसवण्यात आले आहेत. त्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे.

या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून नगरविकास विभागाने हा उपक्रम राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी लागू केला जावा या उद्देशाने शासन निर्णय जाहीर केला आहे.

अर्थात या निर्णयामुळे मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणांमध्ये वास्तव्यात असलेल्या 12 हजार पेक्षा जास्त पाळीव प्राण्यांच्या पालकांना धीर मिळाला असून अनेक प्राणी मित्रांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यानुसार भविष्यात पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group