उन्हाळ्याच्या ऋतूला देशभरात सुरुवात होताच अतीव उत्तरेकडे असणाऱ्या बहुतांश पर्वतीय भागांवर असणारी बर्फाची चादर नाहीशी होते आणि डोंगररांगा एका नव्या आणि भारावणाऱ्या रुपात पर्तारोहिंच्या, ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज होतात. जम्मू काश्मीरमध्येही असे अनेक ट्रेक आहेत, जिथं दरवर्षी या मोसमामध्ये बरीच मंडळी ट्रेकिंगसाठी जातात.
यंदाच्या वर्षीसुद्धा अनेकांनीच जम्मू काश्मीरच्या दिशेनं जात नवे ट्रेक अनुभवण्याची तयारी केली होती. मात्र पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं साऱ्यांचाच अपेक्षाभंग केला.
साऱ्या देशाला हादरवणाऱ्या या हल्ल्यानंतर केंद्र शासनासह जम्मू काश्मीर सरकारनंही काही महत्त्वाचे निर्णय घेत इथं निर्बंध लागू केले. त्यापैकीच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे, जम्मू काश्मीरमधील सर्व ट्रेकिंगच्या ठिकाणांवर प्रवेशबंदी लागू करण्याचा निर्णय जम्मू काश्मीर सरकारनं घेतला आहे. .
जम्मू काश्मीरमध्ये बऱ्याच ट्रेकच्या वाटा घनदाट जंगलातून आणि पर्वतांतून पुढे जातात. मागील तीन वर्षांमध्ये प्रामुख्यानं या भागात स्थानिक आणि इतर राज्यांतून येणाऱ्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला होता. आता मात्र ही परवणी पाहण्यापासून ट्रेकर मुकणार आहेत. 'आम्ही जम्मू काश्मीरमधील सर्व ट्रेक बंद केले आहेत', असं जम्मू काश्मीरच्या वन विभागातील अधिकाऱ्यांनी गोपनीयतेच्या अटीवर सांगितलं. ट्रेक पुन्हा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय सदरील भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, जम्मू काश्मीरमधील सर्व जिल्ह्यांमधील पोलिसांना ट्रेकिंगच्या वाटांची यादी देण्यास सांगण्यात आलं असून, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
जम्मू काश्मीरमध्ये कुठेकुठे आहेत ट्रेकिंगच्या वाटा?
श्रीनगर दक्षिण, उत्तर, पूर्व आणि पश्चिमेसह चिनाब क्षेत्रात प्रत्येकी 10 हून अधिक ट्रेकिंगच्या वाटा आहेत. यामध्ये उत्तरेकडील क्षेत्रात बारामुल्ला आणि कुपवाडा क्षेत्रांचा समावेश आहे. तर, काही वाटा या कठुआ, राजौरी, पूंछ, उधमपूर, किश्तवार इथूनही पुढे जातात.
जम्मू काश्मीरमधील महत्त्वाचे ट्रेक
काश्मीर ग्रेट लेक्स
तारसर मारसर
नाफरान व्हॅली
वारवान व्हॅली
पिरपंजाल ट्रेक रेंज