भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून मोठे चढउतार दिसत आहेत. आधीच लाखाच्या घरात गेलेल्या सोन्याच्या खरेदीबाबत साशंक असलेल्या ग्राहकांना गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या चढउतारामुळे पुन्हा वाट पाहण्याची वेळ आल्याचं चित्र आहे .
भारत आणि पाकिस्तानातील युद्ध थांबताच सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे . 10 ग्रॅममागे 4000 रुपयांची घसरण दिसून येत असून गेल्या आठवड्यात 1 लाख 500 रुपये असणारे सोने आता 96 हजार 710 रुपयांवर आले आहे .
आजचे सोन्याचे भाव किती?
इंडियन बुलियन ज्वेलर असोसिएशनच्या आजच्या आकडेवारीनुसार, 11 मे रोजी मुंबईच्या सोने बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹96,710 तर 22 कॅरेट सोनं (प्रति 10 ग्रॅम) – ₹88,651 रुपयांवर गेलं आहे. या घसरणीमुळे सोन्याच्या गुंतवणुकीबाबत साशंक असलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वीच सोन्याचा भाव 1 लाखाच्या वर गेला होता आणि अनेकांनी खरेदी टाळण्याचा निर्णय घेतला होता. आता युद्धजन्य स्थिती निवळताच आणि बाजारात स्थिरता परतताच सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सध्याच्या स्थितीत सोन्याच्या दरात सातत्याने चढउतार होत असल्याने सोन्याचे दर अजून कमी होतील, असे काही ग्राहकांना वाटत आहे. तर, काही ग्राहकांना सोन्याचे दर अजून वाढतील अशी अपेक्षा असल्याने खरेदी करावी किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाल्याचे सोने व्यावसायिक सांगत आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आणि त्यानंतर सीमेवर भारत-पाक तणावाचा परिणाम दिसून आला आणि सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. आता युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आलीय.