आयपीएल 2025 पुन्हा सुरू व्हायचा मार्ग मोकळा ? पण ''या'' कारणाने  BCCI ची धावपळ?
आयपीएल 2025 पुन्हा सुरू व्हायचा मार्ग मोकळा ? पण ''या'' कारणाने BCCI ची धावपळ?
img
दैनिक भ्रमर
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशवादी तळ नष्ट केले. यानंतर भारत - पाक तणाव वाढला आणि खबरदारी म्हणून देशात सर्वच यंत्रणा हायअलर्ट वर आल्या. दरम्यान, भारत -पाक तणाव वाढला होता त्यादरम्यान गुरूवारी आयपीएल 2025 चा पंजाब आणि दिल्ली यांच्यातला धर्मशालामध्ये झालेला सामना अर्ध्यातच थांबवला गेला, त्यानंतर शुक्रवारी आयपीएल आठवड्याभरासाठी स्थगित केली गेली होती. आता भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यामुळे 16 मे पासून पुन्हा एकदा आयपीएल सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

16 मे ते 30 मे च्या दरम्यान आयपीएलचे उरलेले सामने खेळवण्याचा बीसीसीआयचा प्लान आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार आयपीएलची फायनल 25 मे रोजी होणार होती, पण आता 25 मे रोजीच फायनल खेळवायची असेल तर उरलेले सगळे सामने डबल हेडर म्हणून खेळवावे लागतील. प्रत्येक दिवशी दोन सामने ठेवून 25 मे रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसार आयपीएल फायनल खेळवण्याचा पर्यायही बीसीसीआयपुढे उपलब्ध आहे, पण बीसीसीआय 16 मे ते 30 मे पर्यंत आयपीएल खेळवण्याचा विचार करत आहे.

दरम्यान, 30 मे रोजी आयपीएलची फायनल खेळवली जाणार असेल तर मात्र अंतिम सामन्याचं ठिकाण बदललं जाण्याची शक्यता आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार 30 मे रोजी कोलकात्यामध्ये ढगाळ हवामान आणि पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे आयपीएल फायनल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवली जाण्याची शक्यता आहे. सुरूवातीच्या वेळापत्रकानुसार आयपीएल 2025 ची फायनल कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवली जाणार होती.

इतर बातम्या
Join Whatsapp Group