समृद्धी महामार्गावर रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात सावंगी येथील टोलनाक्यावर दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद वाढून थेट पिस्तुलातून गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दरम्यान या घटनेत भरत घाटगे नावाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्या पोटात गोळी लागली आहे. या घटनेनंतर संबंधित दुसरा कर्मचारी पळून गेला आहे.
पोलिसांनी जखमी कर्मचाऱ्याला तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केलं असून, आरोपीचा शोध सुरु आहे. अचानक घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे टोलनाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे पिस्तूल आले कुठून? प्राथमिक चौकशीत महामार्ग प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं शस्त्र अधिकृतपणे दिलं जात नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याकडे पिस्तूल कुठून आलं, याचा तपास पोलीस करत आहेत.
या गोळीबारामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, हा वाद नेमका कशामुळे पेटला याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, वादाचं कारण किरकोळ असलं तरी त्याने धोकादायक वळण घेतल्याचं स्पष्ट होतं.
गोळीबारानंतर आरोपी कर्मचाऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलिसांनी फरार आरोपीचा कसून शोध सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, इतर कर्मचाऱ्यांचे जबाब आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू आहे. पोलिसांकडून ही बाब गंभीरतेने घेतली जात आहे.