गेल्या काही दिवसात राज्याचे राजकारण सर्वसामान्यांच्या टीकेचे धनी ठरले आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कँटीनमध्ये केलेली मारहाण, त्यानंतर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधिमंडळात झालेल्या हाणामारी, त्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा एक कथित व्हिडिओ आणि लातूरमध्ये कोकाटे यांच्याविरोधातील निवेदन देताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकल्याचा प्रकार यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण यामुळे सर्वसामान्यांना चावडीवर चर्चेसाठी महागाई , बेरोजगारी व्यतिरिक्त नवीन विषय मिळाले आहे.
'छावा'च्या कार्यकर्त्यांना मारहाण करणं भोवलं
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.२०) पत्ते फेकल्याने जोरदार राडा झाला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ छावा संघटना आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. त्यांनी लातूर बंदची हाक दिली आहे. तर हिंगोलीत टायर जाळून निषेध करण्यात आला. त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या घटनेची गंभीर दखल घेत, सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे थेट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
अजित पवार यांची पोस्ट
''काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे.'' असे अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.