काँग्रेसने एकमेव गड जिंकलेल्या लातूरमध्ये महापौरपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर, महापौरपदी आणि उपमहापौरपदी कोण विराजमान होणार हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसकडून लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. लवकरच दोघेही अनुक्रमे महापौर आणि उपमहापौरपदी विराजमान होणार आहेत.
लातूर महानगरपालिकेतील १८ प्रभागांमधील ७० जागांपैकी काँग्रेस पक्षाने ४३ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. वंचित बहुजन आघाडीने ४ जागांवर यश मिळवले असून, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मिळून एकूण ४७ जागा त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे महापालिकेवर काँग्रेस-वंचित आघाडीचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.
महापौर आणि उपमहापौर पदासाठी जयश्री सोनकांबळे आणि ॲड. स्नेहल उटगे यांचीच नावे समोर आल्याने या निवडी औपचारिक ठरल्या आहेत. निकाल स्पष्ट होताच लातूर महानगरपालिकेच्या प्रांगणात काँग्रेस पक्षाच्या वतीने विजय जल्लोष साजरा करण्यात आला. महिला सुरक्षितता, शहरांमधील स्वच्छता आणि शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्हीची सोय योग्य पद्धतीने करण्याचे प्राधान्याने काम करण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित महापौर जयश्री सोनकांबळे यांनी दिली.