हिंदू धर्मात श्रावण महिन्याचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. कारण चातुर्मासात भगवान विष्णु योगनिद्रेत गेल्यानंतर महादेवांकडे सृष्टीचा गाडा असतो. त्यामुळे श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. या महिन्यातील पाचव्या दिवशी नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो. शिवपुराणात याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. श्रावणातील शुक्ल पक्षातील पंचमीला हा सण साजरा करतात. या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने जीवनातील संकटं दूर होतात.
२९ जुलै रोजी श्रावणातील पहिलाच सण म्हणजे नागपंचमी साजरी करण्यात येईल. या सणाचे पारंपारिक महत्व तर आहेच मात्र भगवान शिवाला प्रिय असलेल्या सर्पाचे पूजन यादिवशी केल्याने महादेवाची कृपा मिळते असे म्हणतात. यादिवशी आपल्या देवघरात नागाच्या मूर्तीचे किंवा फोटोचे पूजन सर्वजण करतात. यादिवशी नागदेवतेचे विशिष्ठ पद्धतीने पूजन केल्यास कुंडलीतील कालसर्पदोष नाहीसा होतो असे म्हणतात.
नागपंचमी तिथी व मुहूर्त
नागपंचमी - २९ जुलै
पूजेचा शुभमुहूर्त - सकाळी ५.४१ ते ८.२३ पर्यंत राहणार आहे.
नागपंचमी पूजा विधी
नागपंचमीची पूजा सकाळी लवकर उठून करावी. स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरात नागाची मूर्ती किंवा फोटोचे पूजन करावे. दोन्ही गोष्टी नसतील तर तुम्ही वाळू किंवा मातीचा अथवा पिठाच्या गोळ्याचा नाग बनवू शकता. नागाला हळद,दूध,फुले वाहून पूजा करावी. तसेच लाह्या बत्ताशे यांचा नैवेद्य दाखवावा. यानंतर नागदेवतेला नमस्कार करून 'ओम नागदेवताय नमः' या मंत्राचा किमान एक माळ जप करावा. शेवटी महादेवाची आरती करून पूजेची सांगता करावी.