धक्कादायक : रॅगिंग सहन न झाल्याने दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक
धक्कादायक : रॅगिंग सहन न झाल्याने दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक
img
दैनिक भ्रमर


कॉलेजमध्ये अनेक ठिकाणी रॅगिंगचा प्रकार घडताना दिसून येतो. हे बेकायदेशीर असले तरी कॉलेजमध्ये अनेक सीनिअर विद्यार्थी ज्युनिअर्सचं रॅगिंग करतात. बऱ्याच वेळेस ते मजेखातर असतं, पण त्यामुळे एखाद्याला त्रास होतो, आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकतं.

असाच एक रॅगिंगचा धक्कादायक प्रकार लोणावळ्यात घडला. लोणावळ्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंगमुळे दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. तिच्यावर सध्या पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे रॅगिंग सुरू असून याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती, मात्र पोलिसांनी तेव्हा काहीच कारवाई केली नाही असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

पीडित दिव्यांग विद्यार्थिनी ही लोणावळ्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये BBA/CA च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तिच्या नातेवाइकांनी सांगितले की, ती तेथीलच एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तिचे रॅगिंग करून तिला प्रचंड त्रास दिला जात होता. तिला बाथरूममध्ये कोंडून ठेवलं जायचं, काही विद्यार्थिनी तिच्या मागे चाकू घेऊनही धावत सुटायच्या. दोन वेळा तर तिला चाकुही लागला. 

हे प्रकार घडल्यानंतर पीडित विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांनी याप्रकरणी हॉस्टेलच्या वॉर्डनकडे तक्रार केली होती. मात्र हे प्रकार सुरूच होते, नंतर तिच्या पालकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तिथेही तक्रार दाखल केली. मात्र त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही.

सतत सुरु असलेले रॅगिंग पीडितेला सहन झाले नाही आणि त्यामुळेच तिला ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला. ती तिथे आपल्या जीवनासाठी लढा देत आहेत. या एकंदर प्रकारामुळे मुलीचे पालक आणि नातेवाईक प्रचंड संतापले असून रॅगिंग करणाऱ्या मुलींवर वेळीच कारवाई केली असती तर आमच्या मुलीवर ही वेळ आली नसती, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group