लहान असो वा मोठा, सापाला पाहून भल्याभल्यांची घांबरगुंडी होते. घरात साप निघाल्यावर सर्पमित्राला बोलवले जाते, मात्र सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
या व्हिडिओत एका आजीबाईने घरात निघालेल्या सापाला अलगद पकडल्याचे पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका आजीने निर्भयपणे ८ फूट लांब सापाला पकडल्याचे आणि नंतर तो गळ्यात गुंडाळल्याचे दिसत आहे. ही आश्चर्यकारक घटना पुण्यातील मुळशी तालुक्यातील कासार आंबोली गावातील सांगितली जात आहे.
बिन विषारी धामण जातीचा साप एका घरात शिरला, त्याला ७० वर्षीय शकुंतला सुतार यांनी कुणाच्याही मदतीशिवाय अगदी अलगद पकडले.
शकुंतला सुतार यांचा उद्देश केवळ धाडस दाखवणे नव्हता, तर लोकांमध्ये सापांविषयी जागरूकता पसरवणे आणि अंधश्रद्धा दूर करणे हा होता. त्यांनी सांगितले की, हा उंदीर-बेडुक खाणारा बिन विषारी साप आहे.
मात्र, भीतीमुळे लोक या सापाला मारतात. सध्या या आजीबाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. नेटकरी आजीच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.