मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे रानावनातच रमताना दिसतात. तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने पश्चिम घाटातील निसर्गात वास्तव्य करणाऱ्या सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. उद्धव ठाकरेंचे दुसरे सुपुत्र तेजस ठाकरे हे राजकीय मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, अद्यापही तेजस ठाकरे आपला छंद जोपासत असल्याचे दिसून आले.
दरम्यान खेकड्यांच्या प्रजातीवर संशोधन केल्यानंतर आता, तेजस यांनी सापांची नवी प्रजाती शोधली आहे. तेजस ठाकरे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि डोंगररांगात फिरत असतात. आपला छंद जोपासत नवं संशोधन करण्यासाठी ते ठाकरे वाईल्ड लाईफ संसोधन संस्थेशीही जोडले आहेत. तेजस ठाकरे तसेच ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक हर्शिल पटेल यांनी पश्चिम घाटात संशोधनादरम्यान सापाची नवी प्रजाती शोधून काढली आहे.
या प्रजातीली 'सह्याद्रीओफिस' असं नाव त्यांनी दिलंय. त्यामुळे, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संसोधनात आणखी एक भर पडली आहे. नॅशनल हिस्ट्री म्युझियम, लंडन आणि मॅक्स प्लँक इन्स्टिटय़ूट, जर्मनी या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.
'सह्याद्रीओफिस' असं या सापाला नाव देण्यात आलं आहे. त्यामध्ये संस्कृत शब्द सह्याद्री आणि ग्रीक शब्द ओफिस म्हणजे साप यावरून या नव्या प्रजातीला 'सह्याद्रीओफिस' असं नाव दिलं गेलं आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या या नव्या शोधामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेबाबत नवनवीन माहिती जनतेसाठी उपलब्ध होत आहे.