मालाडमधून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. छोट्याशा कारणावरून येथील एका खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने तिसरीत शिकणाऱ्या मुलाला मेणबत्तीच्या चटके दिले आहे. पालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा तिसरीत शिकत असून खासगी शिकवणीसाठी याच परिसरातील राजश्री यांच्या घरी जातो.
२८ जुलै रोजी राजश्री यांनी फोन करून तुमच्या मुलाचा अभ्यास झाला असून त्याला घेऊन जा, असे सांगितले. त्यानुसार त्यांची मुलगी त्याला आणायला गेली असता, लहान भाऊ रडत असल्याचे तिने पाहिले. त्याला अभ्यासाचा कंटाळा असल्याने रडण्याचे नाटक करीत असल्याचे राजश्रीने सांगितले. घरी आल्यावर मुलीने सर्व प्रकार पालकांना सांगितला.
मुलाला याबाबत विचारले असता त्याने हात पुढे केले. हस्ताक्षर चांगले येत नसल्याने शिक्षिकेने मेणबत्ती पेटवली आणि उजव्या हातावर चटके दिले, असे त्याने सांगितले. डाव्या हातावरही मारहाणीचे वळ दिसले. वारंवार सांगूनही हस्ताक्षर चांगले काढत नसल्याने या शिक्षिकेने आठ वर्षीय मुलाच्या हातावर मेणबत्तीने चटके दिल्याचा संतापजनक प्रकार इथे समोर आला. या शिक्षिकेवर कुरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.