रूग्णांसाठी देवदूत ठरणाऱ्या कार्डिअॅक सर्जनचाच कार्डियक अरेस्टने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चेन्नई मध्ये घडली आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या ३९ वर्षीय डॉक्टराचे नाव डॉ. ग्रॅडलिन रॉय असे आहे.
डॉ. ग्रॅडलिन रॉय हे चेन्नईमधील सविता मेडिकल कॉलेजमध्ये कन्सल्टंट कार्डिअॅक सर्जन म्हणून काम करत होते. त्यांना हार्टअटॅकने गाठले त्यावेळी रॉय हे कामावरच होते. रूग्णांची सेवा करत असताना रॉय यांच्या छातीत अचानक कळ आली अन् ते खाली कोसळले. रॉय यांना वाचवण्यासाठी सहकारी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांना वाचवण्यात यश आले नाही.
रूग्णालयात असल्यामुळे रॉय यांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळाले. सीपीआर, स्टेटिंग, इंट्रा-एओर्टिक बलून पंप, ईसीएमओ यासारखे उपचार रॉय यांना तातडीने मिळाले. पण सर्व डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने चेन्नईमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.