गुगलने काही दिवसांपूर्वी आपल्या सर्च टूलमध्ये एआय फीचर्स जोडले होते. यामुळे यूजर्सना एखादी गोष्ट सर्च केल्यानंतर त्याबाबत समरी आणि व्हिजुअल रिझल्टही दिसणार आहेत. आता हे फीचर भारत आणि जपान या दोन देशांमध्येही लाँच करण्यात आलं आहे.
यामध्ये आता हिंदी भाषेचा सपोर्टही उपलब्ध करण्यात आला आहे. गुगलच्या या फीचरला सर्च जनरेटिव्ह एक्सपीरियन्स असं म्हटलं जात आहे. हे फीचर क्रोमच्या डेस्कटॉप व्हर्जनमध्ये, आणि गुगल अॅपच्या अँड्रॉईड आणि आयओएस व्हर्जनमध्येही वापरता येईल.
कसं काम करेल हे फीचर?
गुगलच्या होम पेजवर गेल्यानंतर डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असणाऱ्या 'गुगल लॅब्स' या आयकॉनवर टॅप करून हे फीचर वापरता येईल. यानंतर यूजर्सना एक नवीन इंटिग्रेटेड सर्च रिझल्ट पेज दिसेल. यामध्ये सर्च केल्यानंतर वरती एआय-जनरेटेड स्नॅपशॉट दिसेल. या स्नॅपशॉटमध्ये सर्च रिझल्टबद्दल समरी आणि अधिक योग्य अशी लिंक देण्यात येईल.
एखादी गोष्ट सर्च केल्यानंतर, त्याबाबत समरीसोबतच आणखी फॉलोअप प्रश्नांची यादीही गुगल देईल. म्हणजेच, त्याबाबत आणखी वेगळी माहिती, किंवा दुसरा प्रश्न विचारायचा असेल तर त्याबाबतही गुगलने सोय केली आहे.
म्हणजेच, समजा की तुम्ही जर सुट्टीत फिरायला जाण्यासाठी योग्य ठिकाण कोणतं? असं सर्च केलं; तर गुगल तुमची लोकेशन किंवा इतर माहिती वापरून तुम्हाला योग्य जागा सुचवेल. समरीमध्ये त्याबाबत अधिक माहिती आणि लिंक देण्यात येईल. सोबतच, 'ही जागा किती दूर आहे?', 'या सीझनमध्ये कुठे फिरायला जाणं योग्य ठरेल?' असे प्रश्नही गुगल समोर देईल.
जाहिराती दिसणार वेगळ्या
एखादी गोष्ट गुगल सर्च केल्यानंतर सगळ्यात वरती शक्यतो स्पॉन्सर्ड अॅड्स दिसतात. या नवीन फीचरमुळे अशा स्पॉन्सर्ड लिंक्स वेगळ्या डेडिकेटेड स्लॉटमध्ये दिसणार आहेत. यामुळे तुम्ही त्यांना अव्हॉईड करू शकाल.
यावर्षी मे महिन्यात सगळ्यात आधी हे फीचर अमेरिकेत लाँच करण्यात आलं होतं. त्यानंतर आता जपान आणि भारतातही हे फीचर देण्यात आलं आहे. हे फीचर यापूर्वी केवळ इंग्रजी भाषेतील सर्च रिझल्टना सपोर्ट करत होतं. मात्र आता यामध्ये हिंदी आणि जपानी भाषांचाही सपोर्ट देण्यात आला आहे