सिल्लोडमधून एक बातमी समोर आली आहे. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी आणि सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफिसाबेगम अब्दुल सत्तार यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सिल्लोड शहरासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
आमदार अब्दुल सत्तार यांच्या राजकीय वाटचालीत नफिसाबेगम यांचा मोठा वाटा होता. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच सत्तार यांच्या प्रत्येक संघर्षात त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या निधनामुळे सत्तार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिल्लोडमधील जनतेने आपला एक आधारवड गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
नफिसाबेगम यांनी केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्याच पार पाडल्या नाहीत, तर सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून शहराच्या विकासात मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी स्थानिक समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.